Study Job Line

UPSC INTERVIEW -upsc interview questions 2020

Latest Books To Crack Any Government Exam

UPSC साठी मुलाखतीस जाताना काय काळजी घ्याल

UPSC interview questions संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना पुढचे आव्हान असते, प्रत्यक्ष मुलाखतीचे. एव्हरेस्ट शिखर चढून गेल्यावर झेंडा रोवण्याचा हा प्रकार असतो !

 कारण झेंडा रोवता आला नाही तर तुम्ही तिथपर्यंत गेल्याचा काहीच उपयोग नसतो. खरे तर आपण प्रामाणिकपणे केलेला अभ्यास, सनदी अधिकारपदाच्या नोकरी विषयी आपली स्पष्ट व सकारात्मक

भूमिका आणि स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांविषयी निश्चित अशी मते ज्या उमेदवाराजवळ असतात, त्याला प्रत्यक्ष मुलाखती विषयी कसलीच भीती बाळगण्याची गरज नसते.

येथे नागरी सेवेच्या मुख्य परीक्षेनंतर जी प्रत्यक्ष मुलाखत होते, त्या मुलाखत कक्षात कसे वातावरण असते, तेथील मुलाखतघेणारे तज्ज्ञ कोणत्या दृष्टीतून तुमच्याकडे पाहतात, त्यांना नेमके काय अपेक्षित असते आणि कशा प्रकारे प्रश्नांची उत्तरे दिलीत तर तुम्ही खात्रीने यशस्वी होऊ शकाल, याविषयी प्रत्यक्ष अनुभवांती मार्गदर्शन केले आहे.

साधे अभिवादन करावे

मुलाखत कक्षात प्रवेश केल्यानंतर साधे नेहमी प्रमाणे अभिवादन करावे. नेहमीपेक्षा वेगळे म्हणजे सॅल्यूट करणे किंवा वेगळा पंथदर्शक असा शब्द उच्चारणे चुकीचे असते. कारण नागरी सेवेत तुम्ही एखाद्या प्रदेशातील लोकसमूहाच्या प्रशासनाच्या सेवेत येणार असता, त्या लोकसमूहातील विविध धर्म, प्रादेशिक व भाषिक स्वाभिमान यांचा योग्य तो सन्मान राखून सर्वांना समान लेखण्याची नि:ष्पक्ष भूमिका तुम्हाला बजावयाची असते. प्रथमदर्शनी त्या भूमिकेला विसंगत असे वर्तन मुलाखतकारांच्या समोर येऊ नये. (upsc interview questions)

मुलाखतकार प्रारंभी तुमचे नाव,कुटुंबाविषयी माहिती आणि तुमचा प्राधान्यक्रम विचारतात. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो. जर तुम्हाला मुलकी, प्रशासकीय सेवेत जायचे आहे, तर त्या विषयी तुम्ही कोणता समारात्मक विचार केला आहे, ते सांगितले पाहिजे. तुम्हाला असे विचारण्यात येईल की तुम्ही पोलीस सेवेत का जाऊ इच्छित नाही, तेव्हा त्या प्रश्नाच्या उत्तरात पोलीस सेवेपेक्षा प्रशासकीय सेवा कशी महत्त्वाची आहे. ते पटवून देण्याचा प्रयत्न करा. परंतु पोलीस सेवेतील तुमच्या दृष्टीने नकारात्मक बाबींचा (उदा. पोलिसांची भाषा, गुन्हेगारांसोबतचे वर्तन) तुम्ही उल्लेख करता कामा नये. महसूल सेवा आणि विदेश – सेवा यांची तुलना करताना तुम्ही जो पर्याय निवडत आहात त्या विषयी तुमचा दृष्टिकोन मांडा पण अन्य पर्यायांविषयी टीकात्मक बोलू नका.

छंद आणि आवडी निवडी

तुम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीपत्रकात तुमचे छंद आणि आवडी निवडी लिहिल्या असतात, त्याविषयी मुलाखतकार फार गंभीर असतात, हे लक्षात घ्या. म्हणून फार विचारपूर्वक त्या गोष्टींची नोंद केली पाहिजे.

उदा. तुम्हाला अध्यात्माची आवड आहे, आणि तुम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण करता असे लिहीले असेल तर लगेच तुम्हाला ज्ञानेश्वरीतील पहिली ओवी विचारली जाऊ शकते. एखाद्या खेळाचा उल्लेख असेल तर त्याविषयी तांत्रिक माहिती किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ताजे संदर्भ विचारले जाऊ शकतात. अन्य प्रश्नांच्या अनुषंगाने योग्य संधी बघून तुम्ही तुमच्या आवडीनिवडींचा उल्लेख करावा. पण त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून तुमचा दुराग्रह दिसता कामा नये.

 उदा. तुम्ही ललित लेखन का वाचत नाही? असा प्रश्न येईल त्याच्या उत्तरात वेळेच्या नियोजनात मी तेव्हढेच वाचू शकतो, असे उत्तर देऊ शकता. पण कथा-कादंबऱ्यांचे वाचन निरुपयोगी असते. असे उत्तर दिल्यास तुमच्याविषयी वाईट मत होऊ शकते, हे लक्षात घ्या.

व्यक्तिमत्त्वाची चाचणी

प्रशासकीय, महसूल, पोलीस किंवा विदेश सेवा असे तुमचे कोणतेही प्राधान्य असले तरी तुमच्या व्यक्तिमत्त्वाची ती चाचणी असते, या चाचणीतून सभोवतालच्या समस्यांची जाणीव तुम्हाला आहे की नाही, ते तपासले जाते. ती जाणीव वास्तववादी आहे की नाही हेही तपासले जाते. म्हणजे उदा. भ्रष्टाचार ही समस्या आहे. पण या समस्येचे स्वरूप आणि कारणे कोणती आहेत, याविषयी विवेचन करताना वर्तमानपत्रे व अन्य प्रसारमाध्यमातून भावनात्मक प्रदर्शन केलेले असते, तसे तुमचे त्या संदर्भातील मत नको.

तर ज्येष्ठ विचारवंत व पत्रकारांच्या लेखनाच्या आधारे तुम्ही तुमचे मत बनविले पाहिजे. केवळ समस्येचे आकलन महत्त्वाचे नाही, तुम्हाला त्या समस्येवरील उपाययोजना विचारली जाईल. लक्षात ठेवा प्रत्येक समस्येचे वास्तववादी विश्लेषण जसे आवश्यक आहे, तसेच त्यावरील वास्तववादी उपाययोजनाही तुम्ही सांगावी अशी अपेक्षा असते. यासाठी अर्थात राष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकांच्या संपादकीय लेखनाचाच मोठा आधार असतो.

मूल्यात्मक भूमिका महत्त्वाची

तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या चाचणीत तुमची मूल्यात्मक भूमिका ही अधिक महत्त्वाची असते. मुलाखतकारांच्या गटामध्ये एक सदस्य आंतरराष्ट्रीय संबंधावरील तज्ज्ञ असतात. ते ताज्या आंतरराष्ट्रीय घडामोडीवरील प्रश्न विचारतात.

उदा. श्रीलंकेच्या संदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजात भारताने स्वीकरलेल्या धोरणाने श्रीलंका-भारत यांच्या संबंधात तणाव निर्माण पर होणार नाही का?

या प्रश्नांच्या उत्तरात तुम्हाला प्रारंभी भारताची परराष्ट्र संबंधामागील भूमिका व इतिहास सांगावा लागेल.त्यासाठी बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक व शांततेच्या विचारांपासून नेहरूंच्या वास्तववादी भूमिकेचा विचार करावा लागेल.

अमेरिका आणि रशिया या महासत्तांमुळे जागतिक राजकारणाचे कसे ध्रुवीकरण झाले होते आणि आज ती परिस्थिती कशी बदलली आहे ते समजून घ्यावे लागेल.

 जागतिकीकरणामुळे भारताचे संरक्षण, व्यापार या संदर्भातील जागतिक पातळीवरचे स्थान आणि आता बदललेले परराष्ट्रीय धोरण याची चर्चा अपेक्षित आहे. पण हे सगळे करताना शत्रूराष्ट्र-मित्रराष्ट्र

अशी सरसकट परिभाषा वापरण्यापेक्षा मानवतावादी, विश्वकल्याणाची व शांततेचे मूल्य तुमच्या चर्चेतून पुढे आले पाहिजे. 

भावनात्मक राष्ट्राभिमानापेक्षा व्यावहारिक-वास्तववादी धोरण व मानवतावादी भूमिका ही अधिक महत्त्वाची असते, हे लक्षात ठेवा. सभोवतालच्या परिसराची माहिती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या व घडामोडींचा अन्वयार्थ जसा महत्त्वाचा असतो, तसेच तुम्ही ज्या परिसरातून येता, त्या परिसरातील सामाजिक, आर्थिक किंवा पर्यावरणविषयक प्रश्नांचे भान तुम्हाला किती आहे, याची चाचणी या मौखिक मुलाखतीतून घेतात. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे.

कारण तुम्ही या परीक्षेची तयारी करताना तुमचे सगळे लक्ष राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्यांवर केंद्रित करीत असता, पण सभोवतालच्या परिसराची माहिती, तेथील समस्या, त्यामागील कारणे, उपाययोजना हेही माहित असणे तुमच्या संपन्न व परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाची खूण असते.

उदा. ज्या भागात नक्षलवादाची समस्या आहे किंवा कुपोषणाची किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची समस्या आहे, तेथील उमेदवारांना त्याबाबत हमखास प्रश्न विचारलाच जातो, हे लक्षात ठेवा.

अशा प्रश्नांचे विश्लेषण करताना केवळ वर्तमानपत्रीय भडक भूमिका तुम्ही ठेवू नका. त्यासंबंधीची अद्ययावत आकडेवारी व त्यासंबंधीचे अहवाल यांची तपशिलवार माहिती तुम्ही जर सांगितली तर तुमचा चांगला प्रभाव पडतो.

आरोग्य व शिक्षण याविषयी प्रश्न

मुलाखतकारांच्या गटात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, ग्रामीण विकास आणि पारंपारिक व अपारंपरिक ऊर्जास्रोत यांचे तज्ज्ञ असतात,ते स्वतंत्रपणे त्या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारत नाही. पण जेव्हा नक्षलवाद, कुपोषण किंवा आत्महत्या या संदर्भात ग्रामीण समस्यांचा विषय येतो, तेव्हा शिक्षण आणि – आरोग्य यासंबंधी काय वस्तुस्थिती आहे, आणि या संदर्भातील उणिवांचा काय संबंध आहे, त्यात सुधारणा करण्यासाठी काय अपेक्षित आहे, याविषयी आपली मते विचारतात. त्यामुळे याबाबत सर्वकष माहिती व भूमिका तयार असणे आवश्यक असते.

मातृभाषेतून संपूर्ण प्रश्नांची उत्तरे देण्याची सोय आहे का ?

 

आपल्या मातृभाषेतून संपूर्ण प्रश्नांची उत्तरे देण्याची सोय आहे. कारण मुलाखतीच्या वेळी तुमच्या मदतीकरिता, म्हणजे तुमच्या प्रश्नोत्तरांचे इंग्रजी-मराठी भाषांतर करून देण्यासाठी लोकसेवा आयोगातर्फे अनुवादकाची रीतसर नेमणूक केलेली असते. इंग्रजी बोलण्यामुळेच आपण मुलाखतकारांवर प्रभाव टाकू शकतो, हा गैरसमज दूर केला पाहिजे. कोणत्या भाषेत उत्तरे देता त्यापेक्षा तुमच्या उत्तरातून तुमचा दृष्टिकोन आणि प्रश्नांविषयींची तुमची भूमिका महत्त्वाची असते. लक्षात घ्या, आकडेवारी, माहितीचा तपशील एखादेवेळी चुकला तर माफ केले जाते, पण नागरी सेवेत प्रवेश करण्याची व भोवतालच्या सर्व प्रश्नांविषयीची तुमची भूमिका वस्तुस्थितीवर आधारित आणि मूल्यात्मक नसेल, तर मुलाखत परिणामकारक होत नाही.

error: Content is protected !!